WhatsApp

चिदंबरमांचा सवाल: दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातले?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली –
पहलगाम येथे मे महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्याचा दावा केला. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी थेट सवाल उपस्थित करत सरकारची गोची वाढवली आहे.



न्यूज पोर्टल ‘द क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले, “NIA ने हल्लेखोरांची ओळख पटवली आहे का? ते पाकिस्तानातून आले हे कोणत्या आधारावर सांगता? कुठे पुरावा आहे? जर ते भारतातच तयार झालेले असतील तर?” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

तसेच, ऑपरेशन सिंदूर संपले आहे का, यावर प्रश्न उपस्थित करत त्यांनी विचारले की, “जर ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, तर आता पुढे काय कारवाई झाली? पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? अटक झाली, असं म्हटलं गेलं होतं. त्यांचं पुढे काय झालं?”

या वक्तव्यानंतर भाजपाने जोरदार टीका केली आहे. भाजपाच्या आयटी सेलप्रमुख अमित मालवीय म्हणाले, “काँग्रेस पुन्हा एकदा पाकिस्तानला क्लीन चिट देत आहे. लष्कर पाकपुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे, आणि काँग्रेसचे नेते इस्लामाबादचे वकील झाल्यासारखे वागत आहेत.”

दरम्यान, काँग्रेस नेते इमरान मसूद यांनी भाजपावर प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “पाकिस्तानला क्लीन चिट आम्ही दिली नाही, ती सरकारनेच दिली आहे. पहलगामचे दहशतवादी जिवंत असल्याचं माहिती असूनही त्यांच्यावर कारवाई का नाही? भाजपाला याबद्दल लाज वाटते का?”

दहशतवादाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जबरदस्त आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!