अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – भारतात आयएसआयने ‘लेडी ब्रिगेड स्लीपर सेल’च्या माध्यमातून दहशतवादी कारवायांचा कट रचल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आग्रा येथील धर्मांतर प्रकरणाचा तपास करताना हे सगळं जाळं उघडकीस आले असून, पाकिस्तानी यूट्यूबर तनवीर अहमद आणि साहिल अदीब यांच्यावर संशय आहे. हे दोघं ऑनलाइन माध्यमातून मुलींना धर्मांतरासाठी तयार करत होते आणि नंतर त्यांना कट्टर विचारांकडे ढकलले जात होते.
सूत्रांनुसार, या स्लीपर सेलसाठी मुलींचा वापर धर्मांतरानंतर जिहादसाठी करण्याची योजना होती. पीडित मुलींना आखाती देशांमध्ये पाठवून त्यांचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये होणार होता. फिलिपाईन्स येथील एका एनजीओमार्फत या नेटवर्कला निधी पाठवला जात होता. क्रिप्टोकरन्सी आणि डॉलर्सच्या माध्यमातून पैशांचा माग लावता येऊ नये, म्हणून अशा पद्धतीने व्यवहार केले जात होते.
कॅनडातील सय्यद दाऊद या मूळच्या भारतातील व्यक्तीकडूनही आर्थिक मदत होत होती. दाऊद सध्या कॅनडात एक इस्लामिक सेंटर चालवत असून, ते संशयित कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती आहे. याशिवाय इंग्लंडहून ‘व्हाईट डोनेशन’च्या नावाखाली या नेटवर्कला निधी मिळत होता.
तपासात हेही स्पष्ट झाले की, या गटाचे व्हॉट्सअॅप नेटवर्क दिल्लीमध्ये सक्रीय होते. त्याद्वारे धर्मांतरासाठी प्रचार केला जात होता. जम्मू-कश्मीरमधील हारिस या मास्टरमाईंडचा तपास वेगाने सुरु आहे.
सध्या या प्रकरणात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. हा एक केवळ धर्मांतराचा नव्हे, तर बहुपातळीवर रचलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी कट असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. धर्मांतर, कट्टरवाद, डिजिटल फंडिंग आणि ISIच्या स्लीपर सेल या सगळ्यांचा धोकादायक संगम या कारवायांमधून स्पष्टपणे दिसत आहे.