अकोला न्यूज नेटवर्क
हैदराबाद – सरोगसी आणि आयव्हीएफ उपचाराच्या नावाखाली बेकायदेशीर बालविक्रीचा एक गंभीर प्रकार हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. सिकंदराबादमधील रेजिमेंटल बाजार परिसरात असलेल्या ‘युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटर’वर पोलिसांनी छापा टाकत मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये एक बाळ ९० हजार रुपयांना गरीब कुटुंबातून विकत घेऊन ते एका श्रीमंत दाम्पत्याला ३५ लाख रुपयांना दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही बाब समोर येण्यामागे एका जोडप्याने केलेली डीएनए चाचणी कारणीभूत ठरली.
पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे, २०२४ मध्ये संबंधित जोडप्याने सरोगसीद्वारे मूल मिळवण्यासाठी क्लिनिकमध्ये नोंदणी केली होती. त्यांना विश्वास दिला गेला की बाळ जैविकदृष्ट्या त्यांचेच असेल. पण प्रत्यक्षात त्यांना दुसऱ्याच कुठल्याशा गरीब कुटुंबातून विकत घेतलेले बाळ देण्यात आले.
या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख आरोपी डॉ. अथलुरी नम्रता (वय ६४), गांधी रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. नारगुला सदानंदम (वय ४१), तसेच एजंट आणि तंत्रज्ञांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे या फर्टिलिटी सेंटरचा परवाना २०२१ मध्येच रद्द झाला होता, तरीही डॉ. नम्रता बेकायदेशीरपणे क्लिनिक चालवत होत्या. याशिवाय त्यांनी कोंडापूर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे तीन बेकायदेशीर सेंटर्स सुरू ठेवले होते. रविवारी या सर्व ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
पोलीस उपायुक्त एस. रश्मी पेरुमल यांनी सांगितले की, “या क्लिनिकमध्ये सरोगसीच्या नावाखाली अनेक जोडप्यांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. आम्ही इतर सेंटर्समध्ये उपचार घेत असलेल्या जोडप्यांचीही चौकशी करत आहोत.”
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नम्रता यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१६ आणि २०२० मध्ये त्यांच्यावर दोनवेळा चौकशी झाली होती. एका प्रकरणात अमेरिकेतील एका अनिवासी भारतीय दाम्पत्याने तक्रार केली होती की, सरोगसीद्वारे मिळालेले बाळ जैविकदृष्ट्या त्यांच्याशी संबंधित नाही. यानंतर तेलंगणा मेडिकल कौन्सिलने सेंटरचा परवाना पाच वर्षांसाठी निलंबित केला होता. त्यानंतर २०२० मध्ये विशाखापट्टणम पोलिसांनी बालतस्करी प्रकरणात त्यांना अटक केली होती.
हैदराबाद, विशाखापट्टणम आणि गुंटूर या ठिकाणी डॉ. नम्रता यांच्याविरुद्ध १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या रॅकेटमुळे सरोगसीच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर बालविक्री व फसवणुकीचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. संबंधित क्लिनिकच्या इतर गुंतागुंतींचा तपास सुरु असून आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.