अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – संसदेत सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडाही गोंधळातच सुरू झाला आहे. आज सोमवार, २८ जुलै रोजी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, विरोधकांनी घोषणाबाजी करतच चर्चा सुरू होण्यापूर्वीच गोंधळ घातल्याने, लोकसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करावे लागले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त करत विरोधकांना थेट सवाल केला, “तुम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची आहे की नाही?”
सकाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही क्षणातच विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज प्रथम काही वेळासाठी, नंतर पुन्हा दोनदा तहकूब केले. अखेर दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. या गोंधळावर बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, “तुमच्याच मागणीनुसार ऑपरेशन सिंदूरवर चर्चा घेण्यात येणार आहे, तरीही तुम्ही चर्चेत सहभागी न होता गोंधळ घालताय. हे योग्य नाही.”
दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की, “विरोधकांनी यू-टर्न घेतला आहे. त्यांनीच आधी चर्चा मागितली आणि आता तेच गोंधळ घालत आहेत. संसदेत पाकिस्तानच्या भाषेत बोलणे किंवा चर्चा टाळणे हे दुर्दैवी आहे.”
रिजिजू पुढे म्हणाले की, “संरक्षण मंत्री स्वतः या विषयावर संसदेत माहिती देणार आहेत. ऑपरेशन सिंदूरसारख्या संवेदनशील विषयावर एकमताने चर्चा व्हायला हवी. पण विरोधकांच्या अशा वागण्याने संसद चलवण्यास अडथळा निर्माण होतो आहे.”
विशेष म्हणजे, आजच्या लोकसभा बैठकीत तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले. पहिल्यांदा सकाळी ११ वाजता गोंधळ झाला. दुसऱ्यांदा अध्यक्षांनी विनंती करूनही गोंधळ सुरू राहिल्याने पुन्हा स्थगिती दिली. अखेर, दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत महत्त्वाचे विधेयक व चर्चा यांच्यावर गोंधळाचे सावट राहिले आहे. पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’वर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यानं ही चर्चा अद्याप लांबणीवर पडली आहे.