WhatsApp

देवाभाऊ, नागपुरात हे काय सुरूय? हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थिनीवर विनयभंगाचा प्रयत्न

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि गृहमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या नागपूरमध्ये मुलींच्या शासकीय वसतिगृहात मध्यरात्री घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. आय.सी. चौकात असलेल्या या वसतिगृहात दोन अनोळखी तरुण घुसले आणि त्यांनी एका इंजिनीअरिंग विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा करत प्रतिकार केल्याने आरोपी पळून गेला. या घटनेनंतर वसतिगृहातील सुरक्षेचा अभाव, प्रशासनाचे निष्काळजीपण आणि पोलिसांच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास दोन तरुण या वसतिगृहात घुसले. त्यापैकी एकाने थेट एका विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश केला आणि तिच्यावर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने जोरदार आरडाओरडा केल्याने घाबरून गेलेल्या तरुणाने तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला.

या घटनेमुळे वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे, या वसतिगृहात ना सीसीटीव्ही आहे, ना सुरक्षा रक्षक, ना कोणतीही तत्काळ मदत मिळवण्याची व्यवस्था. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचा पूर्णपणे असुरक्षित परिसर हे प्रशासनाचं अपयश दर्शवत आहे. विद्यार्थिनींनी तक्रार करूनही वसतिगृह प्रशासनाने पोलिसांना माहिती न दिल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

या घटनेवर विरोधकांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सरकारवरच निशाणा साधला. “नागपुरात पोलिसांचा धाक राहिलेला नाही. वसतिगृहाच्या शेजारी दारूचे दुकान, दरवाजाला कुलूप नाही, सुरक्षा व्यवस्था नाही. अशा स्थितीत मुली सुरक्षित राहणार कशा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या प्रकारामुळे राज्यभरात महिला सुरक्षेबाबतची चिंता अधिकच गडद झाली आहे. नागपूरसारख्या मोठ्या शहरात शासकीय वसतिगृहातही मुली सुरक्षित नसतील, तर इतर भागांतील परिस्थिती काय असणार, असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!