अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे युवा आमदार रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. कुस्ती क्षेत्रातील विविध संघटनांमध्ये गेले काही महिने चाललेला गोंधळ बाजूला सारत अखेर एकमताने ही निवड करण्यात आली. सचिवपदी विजय बराटे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीनंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पैलवानांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देणं, त्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आणि मातीतल्या या खेळाला पुन्हा एकदा लोकप्रियतेचं शिखर गाठवणं, हेच माझं प्रमुख उद्दिष्ट असेल.” त्यांनी सर्व जिल्हा संघटनांचे आणि मतदारांचे आभार मानले आहेत.
राज्य कुस्तीगिर परिषद ही संघटना यापूर्वी दीर्घकाळ शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. या पार्श्वभूमीवरच रोहित पवार म्हणाले, “स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांवर चालणाऱ्या या परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळणं, हे भाग्यच आहे. या संधीचं सोनं करणार.”
राजकीयदृष्ट्या मागील काही महिन्यांपासून कुस्ती संघटनांमध्ये वाद निर्माण झाले होते. मात्र या निवडीनंतर ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद’ हीच खरी आणि मान्यताप्राप्त संघटना असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.
कधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये सक्रिय भूमिका, तर कधी मतदारसंघात विविध विकास कामांमध्ये अग्रेसर असणारे रोहित पवार आता थेट कुस्तीच्या मैदानातही योगदान देणार आहेत. मातीच्या खेळाला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी नव्या पिढीच्या नेतृत्वाची तयारी दर्शवली आहे.