अकोला न्यूज नेटवर्क
राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पिपलोडी गावात शुक्रवारी सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या वर्गाची भिंत आणि छत कोसळल्याने सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २१ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून, शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
गावकरी आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक आणि चार शिक्षकांविरुद्ध डांगीपुरा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६ आणि २१५ अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अद्याप कोणाचंही नाव स्पष्ट केलं नसून, चौकशी सुरु आहे.
या घटनेविषयी स्थानिक विद्यार्थ्यांनी दिलेल्या जबाबानुसार, दुर्घटनेपूर्वी वर्गाच्या भिंतींमधून छोटे दगड पडत असल्याचे त्यांनी शिक्षकांना सांगितले होते. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत बसण्याचे आदेश दिले. यामुळे स्पष्ट होते की विद्यार्थ्यांनी इशारा दिला असतानाही शाळा प्रशासनाने तो गांभीर्याने घेतला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून, या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. समिती अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी करेल.

मुख्य जिल्हा शिक्षण अधिकारी राम सिंह मीणा यांनी सांगितले की, पिपलोडी शाळेतील विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या इतर सरकारी शाळेत हलवण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व जीर्ण वर्गखोल्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत.
या दुर्घटनेने सरकारी शाळांच्या इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाने सात निरागस जीव गमावले गेले आहेत, आणि जनतेत संतापाचे वातावरण आहे. पीडित कुटुंब न्यायाची मागणी करत असून दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.