अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
लोणावळा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत. विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असतानाच, लोणावळा शहरातून एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने लोणावळा परिसरात एकच खळबळ उडाली असून, मानवतेला काळीमा फासणारी ही घटना तीव्र संताप व्यक्त करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. तुंगार्ली येथील नारायणीधाम मंदिरापासून एक तरुणी पायी जात असताना, एका कारमधून आलेल्या तीन तरुणांनी तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. आरोपींनी तिचे हात पाठीमागे बांधले, तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिला मारहाण करत तिचे कपडे काढून विवस्त्र केले. रात्री ९ वाजल्यापासून पहाटेपर्यंत या तिन्ही नराधमांनी चालत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. यानंतर त्यांनी पीडितेला नांगरगाव येथील एका सामसूम रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने तात्काळ लोणावळा शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. घटनेच्या अवघ्या १२ तासांत एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.