WhatsApp

‘वाढदिवसाचं सरप्राईज!’ राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंनी दिली भावनिक प्रतिक्रिया

Share

अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो 
मुंबई :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर एक विशेष आणि चर्चेत राहिलेली घटना घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतः मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ दिला. यामुळे ठाकरे बंधू अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र येताना दिसले.



ही भेट राजकीय व भावनिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरली असून, ठाकरे कुटुंबातील संबंधांमध्ये नवा टप्पा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या अनपेक्षित भेटीवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त केले.

“राज आल्याने वाढदिवसाचा आनंद द्विगुणित नाही, तर कित्येक पटीने वाढला आहे. बऱ्याच वर्षांनी आम्ही दोघं एकत्र भेटलो. ज्या घरात वाढलो, त्या मातोश्रीवर एकत्र आलो. ज्यांनी आम्हाला घडवलं, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या छायेसमोर नतमस्तक झालो. ही बाब माझ्यासाठी अत्यंत खास आहे,” असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले.

राज ठाकरेंनी भेट दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसमोर दोघांनी एकत्र काढलेला फोटोही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, याला भावनिक आणि एकत्र येण्याचे संकेत मानले जात आहेत.

या भेटीवर राज ठाकरेंनीही एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्याचे आणि अनेक आठवणींची उजळणी झाल्याचे नमूद केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातले हे पुनर्मिलन राजकारणाच्या पलीकडे जाऊन व्यक्तिश: स्तरावर महत्त्वाचं ठरत असल्याचे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

या भेटीनंतर ठाकरे बंधूंमधील संबंधात सुधारणा होणार का, पुढे काही नव्या घडामोडी घडतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!