अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
आग्रा : उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी एका अत्यंत संवेदनशील धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला असून, या प्रकरणात पाकिस्तानशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स, एन्क्रिप्टेड चॅट्स आणि डार्क वेबच्या माध्यमातून भारतातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करून इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा कट रचल्याचे उघड झाले आहे.
आग्रा पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. रॅकेटद्वारे मुलींना ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्मवर आकर्षित करून त्यांच्याशी मैत्री केली जात होती. त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक प्रभाव टाकण्यासाठी इस्लामविषयक संवाद घडवले जात होते. या संवादात पाकिस्तानमधील तनवीर अहमद आणि साहील अदीम यांचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कटात काही काश्मिरी महिलांचाही सहभाग असून, त्या हिंदू धर्मातील प्रथा-परंपरांवर टीका करत इस्लामची श्रेष्ठता सिद्ध करत असत. यामध्ये अल्पवयीन मुलींना ब्रेनवॉश करून त्यांचे विचार बदलले जात होते.
या संपूर्ण प्रकरणात उत्तराखंडमधून सुटका करण्यात आलेली २१ वर्षीय मुलगी मुख्य साक्षीदार ठरली आहे. तिने न्यायालयासमोर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १८३ अंतर्गत आपला जबाब नोंदवला आहे. तपासादरम्यान तीने पाकिस्तानमधील लोकांशी संवाद झाल्याचे कबूल केले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्माबाबत दीर्घ चर्चाही झाल्याचे सांगितले आहे.
या कटाचा मूळ उद्देश मुलींना भारतातील सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेपासून तोडून धार्मिक दृष्टिकोनातून परकीय प्रभावाखाली आणणे हाच असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. ऑनलाइन गेमिंग, गुप्त चॅटिंग अॅप्स आणि डार्क वेब यांचा वापर करून अशा प्रकारची पद्धतशीर ब्रेनवॉशिंग प्रक्रिया केवळ धर्मांतरापुरती मर्यादित नसून, देशाच्या सुरक्षिततेसाठीही गंभीर धोका असल्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.
सध्या केंद्र आणि राज्य पातळीवरील गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून, सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.