अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेनं आशिया कप २०२५ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करत भारत-पाकिस्तान सामन्याची अधिकृत घोषणा केली आहे. हा सामना १४ सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर बीसीसीआयवर तीव्र टीका होत असून, पाकिस्तानसोबत सामना खेळण्याच्या निर्णयामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
२२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांनी प्राण गमावले. या घटनेनंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर उघडून निर्णायक कारवाई केली. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत संघ आशिया कपमधून माघार घेईल, अशी शक्यता होती.
मात्र, प्रत्यक्षात बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी व्हर्चुअली आशियाई क्रिकेट परिषदेमध्ये सहभाग घेत स्पर्धेसाठी तयारी दर्शवली. त्यानंतर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि भारत-पाकिस्तान सामना निश्चित झाला.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर देशभक्तीच्या भावनांमध्ये उफाळा आला असून, अनेक वापरकर्ते BCCIला “दुटप्पी भूमिका” घेतल्याबद्दल फटकारत आहेत. कारगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर वेळापत्रक जाहीर केल्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहींनी असा आरोप केला की, “पाकिस्तानसोबत सामना म्हणजे अप्रत्यक्ष त्यांना आर्थिक मदत देणे असून, तो निधी पुन्हा भारताविरुद्ध वापरला जाईल.”
एक वापरकर्ता म्हणतो, “आयपीएल दरम्यान BCCIने भारतीय सेनेच्या नावाने नौटंकी केली आणि आता त्याच पाकिस्तानसोबत सामना स्वीकारतोय, हे प्रचंड दुटप्पीपणाचं लक्षण आहे.”
BCCIकडून यावर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, आशिया कप यजमानपद भारताकडे असल्याने आणि निर्णय केंद्र सरकारच्या सहमतीनंतरच झाल्याचा दावा बीसीसीआयकडून आधीच करण्यात आलेला होता.
या पार्श्वभूमीवर, आगामी काळात देशभक्ती, सुरक्षा आणि क्रिकेट यातील समतोल साधणे हे क्रिकेट प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरणार आहे.