अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो
नवी दिल्ली : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय संदेश दिला. “महाराष्ट्रातील लोकांच्या हिताची आणि अधिकारांची लढाई आपण सोबत लढू,” असे म्हणत त्यांनी इंडिया आघाडीतील एकजुटीचा पुनरुच्चार केला.
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “शिवसेना पक्षाचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीतील आमचे सहकारी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांसाठीची लढाई आपण एकत्र लढू.”
या शुभेच्छांमध्ये राजकीय संकेत असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: आम आदमी पक्षाने अलीकडेच इंडिया आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडण्याची घोषणा केली असून, विरोधी पक्षांमध्ये एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अशा वेळी राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना उद्देशून दिलेला हा संदेश केवळ औपचारिक शुभेच्छा नसून, त्यातून महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांसाठी आघाडी दृढ ठेवण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यात भाजपा विरोधात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या घटक पक्षांचा युती म्हणून सहभाग अपेक्षित आहे.
राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून, “ही एकजूट महाराष्ट्राच्या हितासाठी अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची भूमिका आणि आगामी निवडणुकीतील युतीचा आराखडा लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे.