WhatsApp

पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा! खडसेंच्या जावयाला अटक, अजित पवार म्हणाले, “चुकीचं काही…”

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
पुणे शहरात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. खराडी परिसरातील एका सोसायटीत पुणे गुन्हे शाखेने छापा टाकत एका कथित रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. या कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या नेत्या ॲड. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.



प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करत आहेत. मात्र, कोणीही चुकीचं वागायचं नसतं आणि कोणीही चुकीचं काही करायचं नसतं,” असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी कायद्यानुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

एकनाथ खडसेंनीही दिली प्रतिक्रिया

आपले जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टीत सहभाग असल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. खडसे म्हणाले, “गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू होतं, त्यावरून असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज मला येत होता. पुण्यामध्ये जी घटना घडली, ती मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिली. माझं त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणं झालेलं नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत.”

खडसे यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील, तर मी त्या गोष्टीचे समर्थन कधीही करणार नाही.” त्यांनी पोलीस तपासाबाबतही भाष्य केले. “पोलीस यंत्रणेने खरोखर चांगल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे. परंतु काही ठिकाणी असे होते की, पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही, अशी जनमानसामध्ये प्रतिमा आहे. जर या प्रकरणामध्ये तथ्य असेल, तर जावई असो किंवा कुणीही असो, त्याचे समर्थन कधी करणार नाही. परंतु जर जाणूनबुजून अडकविण्याचा प्रयत्न केला असेल, तर तेही सहन केले जाणार नाही,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!