अकोला न्यूज नेटवर्क
धाराशिव : लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर तिच्याच संस्थेतील एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. नराधमाने मुलीवर केवळ बलात्कारच केला नाही तर लातूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात देखील केला. ही मुलगी ज्या संस्थेत राहत होती, त्याच संस्थेतील कर्मचाऱ्याने पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर क्रूरतेचा कळस गाठला आहे.
पीडित मुलगी आपल्या गावी गेल्यानंतर तिने आजीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितलं. मुलीवरील आपबिती ऐकून पीडितेची आजी देखील घाबरून गेली. मुलीची बदनामी होईल म्हणून त्यांनी कुणालाही काहीच सांगितलं नाही. पण त्यांनी मुलीला पुन्हा संबंधित संस्थेत पाठवायचं नाही, असं ठरवलं. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संस्थेच्या दोन संचालकांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिने याबाबत संस्थाचालक यांच्याशी संपर्क केला होता. पण त्यांनी या घटनेकडे कानाडोळा केला. यानंतर हवालदिल झालेल्या मुलीने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. अखेर पीडित मुलगी ही धाराशिव जिल्ह्यातील तिच्या गावी आली आली. तिने घडलेला प्रकार आजीला सांगितला. यानंतर आजीने मुलीला पुन्हा त्या संस्थेत पाठवायचं नाही, असं ठरवलं.
त्यासाठी आजी शाळेतून दाखला काढण्यासाठी गेल्या. यावेळी आजीला देखील तिथे दमदाटी करण्यात आली. दरम्यान, ही मुलगी त्या एचआयव्ही बाधित संस्थेत परत जात नाही म्हणून धाराशिव कल्याण समितीने विचारणा केली असता या मुलीने सगळा प्रकार त्यांना सांगितला. यानंतर या घटनेला वाचा फुटली.
या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात पीडितेनं फिर्याद दिली. पोलिसांनी पाच आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये बलात्कार करणारा आरोपी कर्मचारी, संस्थाचालक तिथल्या महिला अधीक्षक, संस्थेत काम करणारी आणखी एक महिला यांच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास औसा पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.