WhatsApp

तुमच्या PM-किसानच्या हप्त्यावर दरोडा! ‘या’ मेसेजपासून सावध राहा, कृषी मंत्रालयाचा इशारा!

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली |देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवणारे बनावट संदेश मोठ्या प्रमाणावर पाठवले जात आहेत. “४००० रुपये अतिरिक्त हप्ता मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करा,” अशा खोट्या संदेशांद्वारे ठग शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय त्यांना PM-किसान योजनेचा खरा हप्ता मिळण्यातही अडथळे येण्याची शक्यता आहे.



या गंभीर प्रकाराची दखल घेत कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. मंत्रालयाने शेतकऱ्यांना केवळ अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.gov.in वरूनच माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. फसव्या मेसेजमध्ये अतिरिक्त रक्कम किंवा सबसिडीचे आमिष दाखवले जाते आणि फिशिंग लिंक्सद्वारे आधार व बँक खात्याची माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो. अशा मेसेजमुळे आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी आणि योजनेचा लाभ गमावण्याचा धोका असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.


फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहाल?

कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत:

  • केवळ अधिकृत स्त्रोत तपासा: फक्त अधिकृत PM-किसान पोर्टल (www.pmkisan.gov.in) किंवा @pmkisanofficial या X (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुक हँडलवरच माहिती तपासा.
  • अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका: अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक करू नका किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती (आधार क्रमांक, बँक खाते तपशील, OTP इत्यादी) शेअर करू नका.
  • माहिती अद्ययावत ठेवा: आपले E-KYC पूर्ण करा, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा आणि जमिनीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवा.

PM-किसान योजना काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजना केंद्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये (२००० रुपयांच्या तीन हप्त्यांत) थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जातात. या योजनेचा २०वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपली सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवावीत आणि अशा फसव्या मेसेजपासून सावध राहावे, असे आवाहन मंत्रालयाने पुन्हा एकदा केले आहे.


आपल्या हप्त्याचे स्टेटस कसे तपासाल?

  • www.pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • ‘बेनिफिशियरी स्टेटस’ (Beneficiary Status) या पर्यायावर क्लिक करा.
  • आपला आधार किंवा बँक खाते क्रमांक टाका आणि ‘डेटा’ (Get Data) वर क्लिक करा.

याद्वारे तुम्ही तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती तपासू शकता आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!