अकोला न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर | प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. प्रियकराने प्रेयसीला दौलताबाद घाटातून खाली ढकलून दिले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपी प्रियकर स्वतः शिउर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे.
मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव दिपाली आसवार (वय २४) असून, आरोपी प्रियकराचे नाव सुनील खंडागळे असे आहे. दिपाली आणि सुनील यांचे प्रेमसंबंध होते, मात्र कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद झाले. या वादातून सुनीलने दिपालीला दौलताबाद घाटातून धक्का दिला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी सुनील खंडागळे याला ताब्यात घेतले असून, त्यांच्यात नेमके कोणत्या कारणावरून वाद झाले, याची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.