अकोला न्यूज नेटवर्क
वाशिम | एका धक्कादायक घटनेत, वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एका तत्कालीन उपविभागीय अभियंत्याने कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर खोट्या सह्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे आणि लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध वाशिम शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी सांगलीत कर्जापोटी आणि कामाचे बिल न मिळाल्याने एका तरुण ठेकेदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती, ज्यामुळे राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. ही घटना ताजी असतानाच, वाशिममधील हा नवीन घोटाळा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहरातील विकास कामे वारंवार मुदतवाढ घेऊनही पूर्ण न करणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या मे. अजयदीप इन्फ्राली, औरंगाबाद या कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करून तिला काळ्या यादीत टाकण्याबाबत राम पाटील डोरले यांनी तक्रार केली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई न झाल्याने डोरले यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पोहरादेवी येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमात आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी त्यावेळी हस्तक्षेप करून त्यांना थांबवले.
त्या दरम्यान, तत्कालीन उपविभागीय अभियंता दिनकर नागे यांनी कंत्राटदाराच्या फायद्यासाठी एक बनावट पत्र तयार केले. या पत्रावर राम डोरले यांची खोटी सही आणि चुकीचे नाव वापरून, डोरले यांनी केलेली तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, हे बनावट पत्र मंत्रालयातील उपमुख्य सचिवांच्या नावाने सादर केल्याचेही उघड झाले, ज्यावरून हा संपूर्ण प्रकार समोर आला.
डोरले यांनी या खोट्या कागदपत्रांद्वारे ठेकेदाराच्या बाजूने संगनमताने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे वाशिम पोलिसांनी २३ जुलै रोजी अभियंता दिनकर नागे आणि लिपिक प्रिया तुपलोढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार देवेंद्रसिंह ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (३), ३३६ (२) (३), ३४० (२), आणि ३ (५) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांचा शासकीय कारभारावरील विश्वास कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.