WhatsApp

ठाकरे गटाच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ: मंत्रिमंडळात बदलाचे वारे?

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्रिमंडळ विस्तारावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्र ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीने महायुती सरकारमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारला अडचणीत आणणाऱ्या आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, तर त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळेल, तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.



या दाव्यांवर विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेवर नार्वेकर म्हणाले, “मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवत नाही. मी फक्त पक्षाच्या नेतृत्वाचा आदेश मानतो. तरीदेखील पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन.” नार्वेकरांनाच मंत्रिपद हवे होते, या ठाकरे गटाच्या दाव्यावर ते म्हणाले, “जी पक्षाची इच्छा, तीच माझी इच्छा.”

वादग्रस्त वक्तव्ये करून सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याच्या चर्चेवर राहुल नार्वेकर यांनी वेगळे मत मांडले. ते म्हणाले, “असं काही नाही. सर्व नेते, मंत्री, आमदार चांगलं काम करत आहेत. अनेक लोक असे आहेत ज्यांना काही नव्या संधी मिळणार असतील. पक्षाला त्यांना संधी द्यायच्या असतील, तर तसंही होऊ शकतं. माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पक्ष देईल ती जबाबदारी मला मान्य असेल, तशीच ती इतरांनाही असेल.”

आपल्या आतापर्यंतच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करताना नार्वेकर म्हणाले, “मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण कार्यक्षमतेने काम केलं आहे आणि आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल मी संतुष्ट आहे. बाकी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडेल तेव्हा पडेल, ते पुढचं पुढे बघू.”

ठाकरे गटाच्या या दाव्यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. महायुती सरकारमध्ये खरंच मंत्रिमंडळात खांदेपालट होणार का, राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळणार का, आणि सुधीर मुनगंटीवार विधानसभा अध्यक्ष होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!