जयपूर | भारतीय क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवण्यात आले आहेत. यामुळे त्याचे क्रिकेट करिअर मोठ्या संकटात सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील सांगानेर पोलीस ठाण्यात यश दयालविरुद्ध १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, यश दयालने गेल्या दोन वर्षांपासून या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिला भावनिक ब्लॅकमेलही केले. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्याचे आमिष दाखवून त्याने तिला सीतापुरामधील एका हॉटेलमध्ये बोलावले, जिथे पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलगी पहिल्या घटनेच्या वेळी केवळ १७ वर्षांची असल्याने, पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याआधी, यश दयालविरुद्ध अन्य एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप करत गाझियाबाद जिल्ह्यातील इंदिरापुरम पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवला होता. ६ जुलै रोजी दाखल झालेल्या या एफआयआरमध्ये त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६९ अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २७ वर्षीय यश दयालच्या अटकेला तात्पुरती स्थगिती दिली होती. न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अनिल कुमार यांच्या खंडपीठाने दयालच्या याचिकेवर हा आदेश दिला होता. न्यायालयाने अटकेला स्थगिती देताना, राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास आणि तक्रारदारालाही त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
दयालच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, कलम ६९ अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा तेव्हाच दाखल होऊ शकतो, जेव्हा त्याने लग्न करण्याची कोणतीही इच्छा नसताना खोटे आश्वासन दिले असेल. तक्रारदार महिलेनुसार, ते दोघे सुमारे पाच वर्षांपूर्वी भेटले होते आणि दयालने तिला लग्नाचे वचन दिले होते. ही तक्रार सुरुवातीला २१ जून रोजी मुख्यमंत्रींच्या ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टल (IGRS) द्वारे दाखल करण्यात आली होती.
एकापाठोपाठ दाखल झालेल्या या दोन गंभीर आरोपांमुळे यश दयालच्या क्रिकेट करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणांमुळे त्याच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून, आगामी काळात त्याच्यावर काय कारवाई होते, याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.