अकोला न्यूज नेटवर्क
रेवा (मध्य प्रदेश) | मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील चाकघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सकाळी एका महिलेने अतिदुर्मीळ आणि गंभीर स्थितीत असलेल्या बाळाला जन्म दिला. बाळाचा चेहरा आणि शरीर अत्यंत विकृत असून, तो पाहता ‘एलियन’सारखा भासतो. उपस्थित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांनाही हे दृश्य पाहून धक्का बसला. बाळाची प्रकृती गंभीर असून, त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या महिलेचे नाव प्रियंका पटेल असून, तिचे हे पहिले अपत्य आहे. बाळाचा जन्म नॉर्मल पद्धतीने झाला असला, तरी तो दोन महिने अगोदर जन्माला आला. त्यामुळे बाळाची स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. जन्मत:च बाळाची त्वचा घट्ट आणि कोरडी होती, त्यावर खोल फिशर पडलेले होते. चेहरा, डोळे आणि तोंडाची रचना सामान्य नव्हती, त्यामुळे डॉक्टरांनी संशय व्यक्त करत त्वचारोग तज्ज्ञांची मदत घेतली.
डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, बाळाला ‘हार्लेक्विन इचिथोसिस’ (Harlequin Ichthyosis) नावाचा अतिदुर्मीळ अनुवांशिक आजार आहे. या आजारात त्वचेला संरक्षणासाठी आवश्यक असलेले प्रथिन तयार होत नाही. त्यामुळे त्वचा घट्ट, जाडसर आणि फाटलेल्या अवस्थेत असते. शरीरावरील त्वचा सतत सोलटत राहते आणि संक्रमणाचा धोका वाढतो.
रेव्यातील जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नवीन कुमार मिश्रा यांनी सांगितले की, हा आजार आनुवंशिक असतो. दोन्ही पालक जर या जनुकाचे वाहक असतील, तर बाळाला हा आजार होण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते. बाळाच्या आयुष्यात गंभीर धोके निर्माण होतात. यावर सध्या कोणताही ठोस उपचार नाही. केवळ लक्षणांवर आधारित औषधोपचार व निगा यावर भर दिला जातो.
दरवर्षी जगभरात अशा फार थोड्या प्रकरणांची नोंद होते. भारतातही अशा बाळांचे जन्म अत्यंत दुर्मीळ मानले जातात. त्यामुळे डॉक्टरांनी या बाळावर विशेष लक्ष केंद्रित करत, त्वचारोग, बालरोग व नवजात अतिदक्षता विभागाच्या समन्वयाने उपचार सुरू ठेवले आहेत. बाळाच्या आई-वडिलांचे जनुक चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत, जेणेकरून पुढील धोका ओळखता येईल.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, बाळाचे छायाचित्र पाहण्यासाठी रुग्णालयात गर्दी झाली होती. मात्र डॉक्टरांनी तसे करण्यास मनाई केली आहे, कारण बाळाची त्वचा अत्यंत नाजूक असून संसर्गाचा धोका अधिक आहे. या बाळाचे आयुष्य वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नशील आहेत, मात्र भविष्यातील आरोग्य स्थिती ही उपचारांची सुसूत्रता आणि शरीराच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून राहणार आहे.