अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली | संसदेत पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे ठप्प झाले. बिहारमधील मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले असून, काँग्रेससह इंडिया आघाडीचे अनेक खासदार मकरद्वार प्रवेशद्वारासमोर निदर्शनात सहभागी झाले. या गोंधळावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “या गोंधळातून नव्या पिढ्या काय शिकतील?” असा उद्विग्न सवाल उपस्थित केला.
कामकाज सुरू होताच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू केली. प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी उत्तर देत असताना खासदारांनी आक्रमकपणे घोषणाबाजी करत सत्ताधारी बाकांजवळ जाऊन गोंधळ घातला. या वर्तनामुळे लोकसभाध्यक्ष बिर्ला संतप्त झाले. त्यांनी शांततेचे वारंवार आवाहन केले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.
बिर्ला म्हणाले की, “प्रश्नोत्तराचा तास लोकशाहीचा गाभा आहे. या माध्यमातून सरकार जबाबदार धरले जाते. काँग्रेसचे खासदार असूनही असे वर्तन संसदेला साजेसे नाही. या पक्षाचा शिस्तीचा इतिहास आहे, पण आज टेबल वाजवणे, फलक दाखवणे, घोषणाबाजी हे दिसते आहे. हे तुमच्या पक्षाचे संस्कार नाहीत.” त्यांनी काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांचा नामोल्लेख करत टीकेचे बाण सोडले.
विरोधी पक्षांच्या आंदोलनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बिर्ला यांनी देशातील लोकशाही संस्थांची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन केले. संसद ठप्प होण्याचा थेट परिणाम नागरिकांच्या हितसंबंधांवर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.