अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | ऑगस्ट २०२५ मध्ये बँकांमध्ये सुट्ट्यांचा पाऊस पडणार असून अनेक दिवस देशातील विविध राज्यांतील बँक सेवा बंद राहणार आहेत. रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, जन्माष्टमी, गणेश चतुर्थी यांसारख्या सणांसोबतच नियमित शनिवार-रविवार यांमुळे ऑगस्ट महिन्यात तब्बल १५ दिवसांहून अधिक काळ बँका बंद राहतील. त्यामुळे बँकिंग व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्टीच्या यादीनुसार ३ ऑगस्ट रोजी केर पूजा (त्रिपुरा), ८ ऑगस्टला तेंडोंग लो रुम फात (सिक्किम, ओडिशा), ९ ऑगस्टला रक्षाबंधन (उत्तर भारत), १३ ऑगस्टला देशभक्ती दिवस (मणिपूर), १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन (संपूर्ण देश), १६ ऑगस्टला जन्माष्टमी व पारशी नववर्ष (गुजरात, महाराष्ट्र), २६ आणि २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी (दक्षिण व पश्चिम भारत), आणि २८ ऑगस्टला नुआखाई (ओडिशा, पंजाब, सिक्किम) या दिवशी बँका सुट्टीवर असतील.
या व्यतिरिक्त, १० व २४ ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार, तसेच ३, १०, १७, २४ आणि ३१ ऑगस्ट या रविवारी देशभरातील सर्व बँका बंद राहतील. काही राज्यांमध्ये या सर्व सुट्ट्या लागू असतील, त्यामुळे तेथे बँक सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बँक ग्राहकांनी यामुळे रोख रक्कम, चेक क्लिअरिंग, ड्राफ्ट आणि इतर व्यवहार महिन्याच्या सुरुवातीलाच पूर्ण करून घ्यावेत. मात्र, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि एटीएम सेवा सुरळीत सुरू राहतील. तरीही आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेच्या किंवा वेबसाइटच्या माध्यमातून सुट्ट्यांची खात्री करून पुढील नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.