WhatsApp

इंदिरा गांधींना मागे टाकत मोदींचा ऐतिहासिक विक्रम; आता थेट नेहरूंशीच मुकाबला

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार, २५ जुलै २०२५) भारताचे पंतप्रधान म्हणून सलग ४०७८ दिवस पूर्ण करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे मोदी हे भारताचे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहिलेले दुसरे नेते ठरले असून आता त्यांची थेट स्पर्धा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी आहे.



इंदिरा गांधी यांनी सलग ४०७७ दिवस म्हणजेच २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ या काळात भारताचे नेतृत्त्व केले होते. तर नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी सलग ४०७८ वा दिवस पूर्ण केला.

या विक्रमाबरोबरच मोदी यांच्यावरील आणखी काही ऐतिहासिक टप्पे लक्षवेधी ठरतात. ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. ते बिगर-काँग्रेसी असूनही सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांच्याच नेतृत्वात भाजपाने गुजरातमध्ये सलग २००२, २००७ व २०१२ च्या विधानसभा निवडणुका आणि केंद्रात २०१४, २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.

मोदी यांनी एकूण २४ वर्षांहून अधिक काळ शासनाची धुरा वाहिली असून हे सर्व पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक आहे. आता नेहरूंचा विक्रम मोडण्यासाठी मोदींना २०४८ दिवसांचे पंतप्रधानपद आवश्यक आहे. नेहरूंनी १५ ऑगस्ट १९४७ पासून २७ मे १९६४ पर्यंत सलग ६१२६ दिवस पंतप्रधानपद भूषवले होते.

Watch Ad

मोदींना हा विक्रम गाठायचा असेल तर २०२९ ची लोकसभा निवडणूकही त्यांच्या नेतृत्वात भाजपाला जिंकावी लागेल. त्यामुळे मोदींच्या पुढील राजकीय वाटचालीकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!