WhatsApp

“विफा” चक्रीवादळाचे परिणाम! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर :
‘विफा’ चक्रीवादळाचे अवशेष आणि त्यातून तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. ईशान्य अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचे वातावरण निर्माण झाले असून हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.



विशेषतः कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. रायगडसह संपूर्ण कोकणासाठी पुढील ४८ तास रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आहे. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह सात जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात वातावरण ढगाळ असून अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला नापणे धबधबा सध्या भरभरून वाहत असून कोल्हापूर-तरळे राष्ट्रीय महामार्गावरून अवघ्या ६ किमी अंतरावर व वैभववाडी रेल्वे स्थानकापासून ३ किमीवर असल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. नुकतेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या धबधब्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. मात्र, या भागात पायाभूत सुविधांची उणीव असल्याने प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४-४८ तास राज्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!