अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सॲप या लोकप्रिय मेसेजिंग ॲपची सेवा गुरुवारी रात्री उशिरा अचानक डाऊन झाली. भारतासह जगभरातील हजारो वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यात आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचणींचा सामना करावा लागला.
सर्वसामान्य वापरकर्त्यांपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकांनी एक्स (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲप सेवेबाबत तक्रारी नोंदवल्या. काही मिनिटांतच #WhatsappDown हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये गेला.
व्हॉट्सॲप ॲपसोबतच वेब व्हर्जन देखील काम करत नव्हते. यामुळे अनेकांच्या दैनंदिन संवादात अडथळा निर्माण झाला. याचदरम्यान, ऑनलाईन सेवा नोंदवणाऱ्या डाउनडिटेक्टर या संकेतस्थळावर रात्री ११:१६ वाजेपर्यंत १,१८६ तक्रारी नोंदवण्यात आल्या.
वापरकर्त्यांनी केलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने मेसेज पाठवण्यात होणारी अडचण, स्टेटस अपलोड न होणे, आणि ॲप एकंदरच न उघडणे यांचा समावेश होता.

सध्या तरी व्हॉट्सॲप किंवा मेटाकडून या तांत्रिक बिघाडामागील कारणांविषयी कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्यामुळे सेवा नेमकी का ठप्प झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, व्हॉट्सॲप डाऊन होताच सोशल मीडियावर मीम्स आणि विनोदी पोस्ट्सचा अक्षरशः पूर आला. ‘व्हॉट्सॲप बंद आहे का?’, ‘माझा इंटरनेटच नसेल बहुतेक’, ‘स्टेटस अपलोड होत नाही’ अशा अनेक प्रतिक्रियांनी एक्स आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवर धुमाकूळ घातला.
पुन्हा एकदा मेटाच्या डिजिटल सेवांवरील विसंवाद, सिस्टिम लोड किंवा संभाव्य सायबर बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, वापरकर्त्यांना अधिकृत खुलाशाची प्रतीक्षा आहे.