अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | लिंग निवड प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी, जनजागृती मोहिमा आणि सोनोग्राफी केंद्रांवरील तपासण्या या कारणांमुळे अकोला जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक सुधारणा झाली आहे. २०२४-२५ या वर्षासाठी सीआरएस अहवालानुसार जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रति हजार पुरुषांमागे ९४० महिलांवर पोहोचले आहे.
ही माहिती पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत समोर आली. जिल्हा रुग्णालयात आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वंदना पटोकार होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञ सदस्य बैठकीस उपस्थित होते.
पुर्वी २०२२-२३ मध्ये लिंग गुणोत्तर ९०२, तर २०२३-२४ मध्ये ९१९ इतके होते. या तुलनेत सध्याचे ९४० हे प्रमाण निश्चितच सकारात्मक आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वारे यांनी यामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की, अचानक धाडी, तपासण्या आणि केंद्रांकडून नियमित अहवाल मागवणे यामुळे हे यश मिळाले आहे. समितीची दर महिन्याला बैठक होणार असून, तपासणी यंत्रणा अधिक सक्रीय करण्यात येणार आहेत.
केंद्रांच्या परवानग्या, नूतनीकरण, हस्तांतरण अशा बाबतीतही कायद्याने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे, असे निर्देशही देण्यात आले. गरज पडल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर संपर्क साधून बेकायदेशीर तपासणीबाबत माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली. ही माहिती गोपनीय ठेवली जाते आणि कारवाई झाल्यास माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते, अशी माहिती ॲड. शुभांगी ठाकरे यांनी दिली.
बैठकीत ॲड. ठाकरे यांनी कायद्याच्या बाबी स्पष्ट करताना सांगितले की, काही नागरिक जिल्ह्याबाहेर जाऊनही तपासण्या करून घेतात. त्यामुळे परिसरातील सजग नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला देणे आवश्यक आहे. यामुळेच ‘मुलगी वाचवा’चा संदेश खऱ्या अर्थाने मूर्तरूपात उतरतो आहे.