अकोला न्यूज नेटवर्क
अकोला | श्रावण महिन्यातील कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरासह जिल्ह्यात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही मार्गांवर वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केले आहेत.
हा वाहतूक बदल पहिला श्रावण सोमवार २८ जुलै, दुसरा सोमवार ४ ऑगस्ट व तिसरा सोमवार ११ ऑगस्टसाठी लागू राहणार असून, यासाठी दर रविवारी म्हणजे २७ जुलै, ३ ऑगस्ट व १० ऑगस्ट रोजी रात्री ८ पासून सोमवारच्या रात्री १२ पर्यंत अकोला शहरात वाहतूक मार्ग वळवले जाणार आहेत. राज्य महामार्गांवरील वाहतुकीसाठी रविवारच्या दुपारी २ वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बदल लागू राहतील. चौथा श्रावण सोमवार १८ ऑगस्टसाठी हा बदल १७ ऑगस्ट रात्री ८ पासून १८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत अकोला शहरात व लागू राहील, तर राज्य महामार्गांवरील बदल १७ ऑगस्ट दुपारी १२ पासून रात्री ८ पर्यंत राहणार आहे.
वाहतूक वळविण्याचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
अकोला- अकोट व अकोला- दर्यापूर महामार्गावरील वाहतूक अकोला बसस्थानक, अशोक वाटिका, वाशिम बायपास, शेगाव टी पॉईंट, गायगाव-निंबा फाटा, देवरी-अकोट आणि दुसऱ्या मार्गाने म्हैसांग दर्यापूर अशी वळवली जाईल.
अकोला शहरातील वाहतूक रेल्वेस्थानक ते कोतवाली चौक, डाबकी रोड, पोळा चौक, हरिहरपेठ, लक्झरी बसस्थानक या प्रमुख मार्गांवर उड्डाणपूल, जेल चौक, अशोक वाटिका मार्गे वळवण्यात येईल.
मूर्तिजापूर-दर्यापूर मार्गावरील वाहतूकही हिरपूर, बोरटा, आसरा फाटा, अमरावती रोडमार्गे वळवण्यात येणार आहे.
यात्रेच्या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसारच प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.