अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | मुंबईतील मुलुंड परिसरातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांसह दोन भावांनी आणि एका ओळखीच्या व्यक्तीने तब्बल 11 महिने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष कृत्याने संपूर्ण शहर हादरले असून, समाजात मुलींच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही घटना जानेवारी 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली. पीडित मुलीवर तिच्या 57 वर्षीय वडिलांनी, 16 आणि 18 वर्षीय दोन भावांनी तसेच एका परिचित व्यक्तीने वारंवार लैंगिक शोषण केले. भय आणि दहशतीखाली दबलेली ही मुलगी बराच काळ गप्प राहिली. अखेर तिने बालसुधारगृहातील अधीक्षकांना आपली व्यथा सांगितली. अधीक्षकांनी तातडीने याची दखल घेत चाईल्ड वेल्फेअर कमिटी (सीडब्ल्यूसी) यांच्याकडे तक्रार नोंदवली. सीडब्ल्यूसीने मुलीचा जबाब नोंदवून पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे. यातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, तर पीडित मुलीला संरक्षणासाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेने कुटुंबातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. समाजात याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, कठोर कारवाईची मागणी होत आहे.