अकोला न्यूज नेटवर्क
जोधपूर : राजस्थानातील जोधपूर येथे मंगळवारी दुपारी एक विचित्र पण धक्कादायक प्रकार घडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पतीला आपल्या मेहुणीसोबत फिरताना पाहिल्यावर संतप्त झालेल्या पत्नीने थेट हेल्मेटनं त्याच्यावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही घटना मंगळवारी 1.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महिलेला संशय होता की तिच्या पतीचे तिच्याच बहिणीशी, म्हणजेच मेहुणीशी अनैतिक संबंध आहेत. ती या दोघांवर नजर ठेवून होती. जेव्हा तिने पतीला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ त्याच मेहुणीसोबत पाहिले, तेव्हा तिचा संयम सुटला. पत्नीने रागाच्या भरात पतीला थांबवलं आणि वाद घालत थेट डोक्यावर हेल्मेटने जोरदार प्रहार केला.
आजूबाजूच्या लोकांनी हस्तक्षेप करत दोघांना वेगळं केलं. घटनेची माहिती मिळताच उदय मंदिर पोलीस ठाण्याचे अधिकारी सीताराम खोजा यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पती, पत्नी आणि मेहुणी या तिघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. सध्या कोणतीही तक्रार दाखल झालेली नसली तरी पोलिसांनी या तिघांनाही समज दिली असून, अशा प्रकारचे वर्तन सार्वजनिक ठिकाणी टाळण्याचा इशारा दिला आहे.
हा प्रकार फक्त कुटुंबातील संघर्ष नव्हे, तर वैवाहिक नात्यांतील विश्वासघाताच्या गंभीर परिणामाचं उदाहरण आहे. विवाह्यबाह्य संबंधांच्या शक्यतेवरून भांडणं वाढत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते. यासारख्या प्रकारांमुळे केवळ नातीच नव्हे, तर सामाजिक शिस्तही धोक्यात येते.