अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : विवाह नात्याला काळिमा फासणारी घटना दिल्लीतील निहाल विहार परिसरात उघडकीस आली आहे. एका २५ वर्षीय महिलेने लैंगिक समाधान न मिळाल्याने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. मृत पतीचे नाव मोहम्मद शाहिद असून, ही घटना २० जुलै रोजी दुपारी ४.१५ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक चौकशीत, पतीसोबत शारीरिक संबंधांमध्ये असमाधान असल्याचे कारण पत्नीने दिले. तिच्या म्हणण्यानुसार, शाहिद हा सतत ऑनलाइन पत्ते खेळण्यात व्यस्त असायचा आणि त्याच्यावर मोठे कर्ज होते. इतकेच नव्हे, तर तिने त्याच्या चुलत भावासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत, त्याला अडथळा समजून हटवले, असा पोलिसांचा अंदाज आहे.
हत्येनंतर महिलेने बनाव रचण्याचा प्रयत्न केला. पतीने आत्महत्या केल्याचा देखावा करत, त्याने पावरच्या गोळ्या घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर घर स्वच्छ केलेले आढळले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला, मात्र फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालात खुनाचे स्पष्ट संकेत मिळाले.
महिलेने सुरुवातीला स्वतःला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने पोलिस चौकशीत अखेर गुन्ह्याची कबुली दिली. डीसीपी सचिन शर्मा यांनी या प्रकरणाला अत्यंत गुंतागुंतीचे व संवेदनशील ठरवले असून, बरेलीतील चुलत भावाचीही चौकशी करण्यात येत आहे. सध्या आरोपी महिला पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.