WhatsApp

भाजप नेत्यावर मॉडेलचा गंभीर आरोप; ‘डोळे उघडले तेव्हा कपडे नव्हते’, पोलिसांत गुन्हा दाखल

Share

अकोला न्यूज नेटवर्क
गिर सोमनाथ (गुजरात) : गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला परिसरातील एका रिसॉर्टमध्ये जाहिरातीसाठी गेलेल्या महिला मॉडेलने भाजपच्या स्थानिक नेत्यावर गंभीर स्वरूपाचे लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित नेत्याने तिला कोल्ड्रिंकच्या माध्यमातून बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही, तर नंतर धमकी देत तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



संबंधित महिला सुरतमधील रहिवासी असून मॉडेलिंगच्या माध्यमातून जाहिरात क्षेत्रात काम करत होती. ती तिच्या पतीसह गिर सोमनाथ जिल्ह्यातील बोरवाव येथील रिसॉर्टमध्ये शूटिंगसाठी आली होती. त्याच दरम्यान तिच्या पतीचा मित्र आणि भाजपचा स्थानिक नेता प्रदीप भाखर देखील त्यांना भेटायला आला होता. जेवणानंतर पती काही काळासाठी बाहेर गेला आणि त्याच वेळी हा संपूर्ण प्रकार घडला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, भाखरने तिला कोल्ड्रिंक दिले होते, ते प्याल्यानंतर तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. शुद्धीवर येताच तिने स्वतःला नग्न अवस्थेत पाहिले. जेव्हा तिने त्याच्याकडे प्रश्न केला, तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे सगळं मॉडेलिंगमध्ये होतं.” त्यानंतर तिला धमकावण्यात आले की, तिने जर याबाबत कुणाला सांगितले, तर तिचे व्हिडिओ व फोटो सार्वजनिक केले जातील.

तिने सोशल मीडियावर पोलिसांकडे याबाबतची माहिती दिली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे ती स्वतः तलाला पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. इतक्यावरच न थांबता तिने आणखी एक मोठा खुलासा केला – तिला ड्रग्ज प्रकरणात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आणि दोन महिने तिला तुरुंगवास भोगावा लागला.

महिलेने पोलिसांकडे स्पष्ट मागणी केली आहे की आरोपीला तातडीने अटक करून न्याय द्यावा. ‘माझी बदनामी केली गेली, आता मी गप्प बसणार नाही’, असा स्पष्ट इशारा तिने दिला आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!