अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिली असतानाच, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, २४ जुलैपासून पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये मध्यम ते अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा यांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह्यांत २४ ते २७ जुलैदरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, हिंगोली आणि वाशीम या जिल्ह्यांतही सतत पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना आणि संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही सलग चार दिवस पाऊस होईल. विशेषतः परभणीत २४ जुलै दुपारनंतर पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. अहिल्यानगरमध्ये तर २४ ते २८ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात २४ ते २७ जुलैदरम्यान खंडित स्वरूपात पाऊस होईल. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पारोळा, यवल आणि चाळीसगाव येथे २४ पासून पावसाची तीव्रता वाढेल आणि २६-२७ जुलै रोजी पिकांसाठी उपयुक्त पाऊस होईल.

पावसाचा हा जोर २८ जुलैपर्यंत राहण्याची शक्यता असून, त्यानंतर काहीसा ब्रेक येईल. २९ जुलैपासून विदर्भात सूर्यप्रकाश पाहायला मिळेल. मात्र, पुढील पावसाची फेरी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात परत येईल, असाही अंदाज वर्तवला आहे.
शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजानुसार पुढील शेती नियोजन करावे, पिकांचे संरक्षण करावे आणि नाल्यांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.