अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : नाग, घोणस, फुरसे किंवा मण्यार… गावकुसाबाहेर, शहराच्या गल्ल्यांत, एखाद्या इमारतीच्या पायऱ्यांखाली डोकावणारे हे सर्प पाहताच नागरिक घाबरून जातात. अशा वेळी मदतीला धावणारे सर्पमित्र आता ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून ओळखले जाणार आहेत. त्यांना शासनाकडून अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार असून, 10 लाख रुपयांचा अपघात विमा देखील मंजूर होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सर्पमित्र हे वन्यजीव आणि माणसांमधील संघर्ष टाळण्यासाठी झटत असतात. अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते नागराजाला सुरक्षितपणे जंगलात सोडतात. काही वेळा त्यांना साप चावल्याने गंभीर दुखापती किंवा मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे सर्पमित्रांचा विमा आणि अधिकृत दर्जा ही काळाची गरज असल्याचे म्हटले जात आहे.
राज्यात अनेक स्वयंसेवक सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत. विशेषतः पावसाळ्यात, सर्पांची हालचाल वाढल्याने त्यांच्या कॉल्सचे प्रमाणही वाढते. मात्र, बहुतांश सर्पमित्रांकडे प्रशिक्षित कौशल्य नसते. त्यामुळे साप पकडताना अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून सरकारकडून प्रशिक्षण व विमा सुविधा देण्याचा विचार सुरू आहे.
बावनकुळे यांनी सांगितले की, सर्पमित्रांना ओळखपत्र देऊन त्यांना अधिकृत मान्यता देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. त्यांच्या सेवेला ‘अत्यावश्यक’ दर्जा दिला जाणार आहे. सरकारकडून यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले जाणार असून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्पमित्रांची नोंदणी व वर्गवारी केली जाणार आहे.

अलिकडच्या काळात सर्पमित्रांची संख्या वाढलेली दिसते. मात्र, या वाढीमुळे काही ठिकाणी अयोग्य हाताळणी, सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासातून सापाशी ‘फोटोशूट’ करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या कार्याला गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
कधीकाळी गावागावात गारुडी किंवा नागवाला बाबा असायचे. सर्पमित्र ही त्यांच्या जागी उभी राहिलेली नवी पिढी आहे. या पिढीला प्रशिक्षित, सुसज्ज आणि सुरक्षित बनवण्यासाठी सरकारने केलेला हा पुढाकार स्वागतार्ह मानला जात आहे.