अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशभरात वेगाने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विकास कामाला चालू आर्थिक वर्षात गती कमी झाली असून, प्रतिदिन रस्ते बांधणीचा वेग घटल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.
गडकरी म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दररोज ३४ किलोमीटरच्या वेगाने रस्ते बांधणी झाली. मात्र, चालू वर्षात म्हणजे २०२४-२५ मध्ये दररोज फक्त २९ किलोमीटर रस्त्यांचे काम झाले. याआधी, २०२०-२१ मध्ये हीच गती प्रतिदिन ३७ किलोमीटरपर्यंत पोहोचली होती, जो राष्ट्रीय महामार्ग विकासाचा आजवरचा विक्रमी वेग होता.
त्याचप्रमाणे मागील तीन आर्थिक वर्षांत झालेल्या एकूण रस्ते बांधणीच्या लांबीबाबतही त्यांनी तपशील दिला. २०२२-२३ मध्ये १०,३३१ किलोमीटर, २०२३-२४ मध्ये १२,३४९ किलोमीटर आणि २०२४-२५ मध्ये १०,६६० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले.
पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन अंतर्गत हायस्पीड कॉरिडॉर आणि एक्सप्रेसवेचे काम सुरू असून, भारतमाला परियोजनेअंतर्गत २६,४२५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे टेंडर देण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत २०,७७० किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली.
दरम्यान, लोकसभेत भाजप खासदार स्मिता वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे-रिवा एक्सप्रेसला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.