अकोला न्यूज नेटवर्क
सातारा (कोरेगाव) | “घटस्फोट घेणार आहे” असं सांगत लग्नाचं आमिष दाखवून सातत्याने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या डॉक्टरविरुद्ध एका महिला डॉक्टरने कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉ. गणेश हरिभाऊ होळ (रा. सुभाषनगर, कोरेगाव) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या डॉक्टर सेलचे सातार्याचे अध्यक्ष आहेत.
तक्रारदार महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, २०१३ साली सत्यनारायण पूजेनिमित्त तिच्या घरी आलेल्या डॉ. होळ यांच्याशी ओळख झाली. त्या वेळी तिचे पती मृत्यू पावले होते आणि ती मुलांसह एकटी राहत होती. याचा फायदा घेत डॉ. होळ यांनी तिला जवळ केले आणि प्रेमाचा बनाव केला. अनेक वेळा लग्नाची आश्वासने देत त्यांनी तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
तिने स्पष्टपणे सांगितले की, १७ जानेवारी २०१९ रोजी त्यांनी तिला घरी बोलावले आणि आपली पत्नी माहेरी गेली असल्याचे सांगितले. घटस्फोटाची हमी देत त्यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर विटा, वाठार, पाचगणी आणि अन्य ठिकाणीही वारंवार संबंध ठेवले गेले.
तथापि, इतक्या वर्षांनंतरही त्यांनी लग्न टाळण्याची भूमिका घेतली असून, उलटपक्षी धमक्या देण्यास सुरुवात केली. “कुणाला सांगितलंस तर तुला आणि तुझ्या मुलांना संपवीन,” असे धमकीचे बोल आरोपीने वापरल्याचे महिलेने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे या अधिक तपास करत आहेत. आरोपीच्या राजकीय पदामुळे ही कारवाई अधिकच संवेदनशील मानली जात आहे.