WhatsApp

दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी; नागपूरच्या लेकीने बुद्धिबळ विश्वात रचला नवा इतिहास

Share

अकोला न्यूज नेटवर्क
जोर्जिया |
नागपूरच्या १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नाफिदाय महिला जागतिक बुद्धिबळ कपमध्ये ऐतिहासिक यश मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या झोंगी टॅनचा पराभव करत 1.5-0.5 असा मिनी सामना जिंकला. या कामगिरीसह दिव्या महिला कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे.



या स्पर्धेत दिव्याने चीनच्या दुसऱ्या मानांकित झू झोनर आणि नंतर भारतीय ग्रँडमास्टर डी. हरिकालाही पराभूत करत आपले वर्चस्व अधोरेखित केले. उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात १०१ चालींमध्ये झोंगी टॅनला नमवले आणि दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत कोनेरू हम्पीनेही चीनच्या टिंगजी लेईशी ७५ चालींमध्ये बरोबरी साधली असून टायब्रेकरमध्ये निर्णय होणार आहे.

नागपूरमध्ये जन्मलेल्या दिव्याने पाचव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. २०१२ मध्ये अंडर-७ राष्ट्रीय जेतेपद, २०१४ मध्ये डरबन येथे अंडर-१० जागतिक जेतेपद, २०१७ मध्ये ब्राझील येथे अंडर-१२ जागतिक जेतेपद मिळवले. २०२१ मध्ये ती विदर्भातील पहिली महिला ग्रँडमास्टर ठरली, तर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टरचा किताबही पटकावला.

२०२४ मध्ये दिव्याने वर्ल्ड ज्युनियर गर्ल्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये ११ पैकी १० गुण मिळवत विजेतेपद मिळवले. याशिवाय, ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यातही तिचे मोठे योगदान होते. दिव्या आता बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्वल करणारी चमकती तारा बनली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!