अकोला न्यूज नेटवर्क
पंढरपूर | माढा तालुक्यातील अरण गावात काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्तिक खंडागळे या १० वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी खळबळजनक माहिती उघड केली आहे. या हत्येचा सूत्रधार मुलाचाच १९ वर्षीय चुलत भाऊ सचिन महादेव खंडागळे असल्याचं निष्पन्न झालं आहे. सचिनचे एका नातलग महिलेशी अनैतिक संबंध होते, जे कार्तिकला समजले होते. हे प्रकरण घरात उघड होईल या भीतीने सचिन, त्याचा दुसरा चुलत भाऊ संदेश आणि आणखी तिघांनी मिळून कार्तिकची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस तपासात कार्तिकला गोड बोलून बाहेर नेण्यात आले. घटनास्थळी सचिन आणि अन्य दोघांनी त्याचा गळा दाबून आणि चाकूने वार करत निर्दयपणे हत्या केली. यानंतर आरोपींनी पोलिसांसमोर शोध घेण्याचं नाटक केलं. मात्र, परिसरातील CCTV फुटेज तपासताना पोलिसांना मृत कार्तिकला आरोपींच्याच दुचाकीवरून नेताना दिसून आले. त्यानंतर सचिन आणि संदेशला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या हत्येनंतर गावात संतापाचे वातावरण आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. कुटुंबाच्या विश्वासाला तडा देणारी ही घटना परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.