अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्यातील शेतकरी आंदोलनात सक्रीय असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे २० जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. प्रा. जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील. या घडामोडींसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या जिल्हाध्यक्षांनी नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या समस्यांवर अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उदय सामंत यांनी म्हटले की, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत यायचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आता थेट सरकारच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळेल.”
दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीत मंत्रिपदांबाबत असलेल्या नाराजीला शांत करण्यासाठी महामंडळ वाटपाचा नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. सत्तेत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये महामंडळांचे वाटप संख्या बळानुसार करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला ४४, शिवसेनेला ३३, तर राष्ट्रवादीला २३ महामंडळांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेत होणारा स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात शिंदे गटाची पकड अधिक बळकट होईल, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
