WhatsApp

“हर्षलनंतर मी?” – कंत्राटदाराचा मेसेज वाचून आव्हाड हादरले; मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेपाची विनंती

Share

अकोला न्यूज नेटवर्क
सांगली | जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण केलेल्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे आणि कर्जाच्या तगाद्याने त्रस्त होऊन हर्षल यांनी जीवन संपवलं. या घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठली असून, आता आणखी एका कंत्राटदाराने “हर्षलनंतर कदाचित मीच” असे लिहिताच खळबळ उडाली आहे.



या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्या कंत्राटदाराच्या मेसेजचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. आव्हाड यांनी नमूद केलं की, “हे केवळ एक आर्थिक संकट नाही, तर प्रशासकीय अपयशाचे लक्षण आहे.” त्यांनी सरकारच्या लोकप्रिय योजनांमागच्या आर्थिक असंतुलनावरही प्रश्न उपस्थित केला.

हर्षल पाटील यांच्यावर जवळपास १.४० कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यांनी यासाठी ६५ लाखांचे कर्ज घेतले होते. काम पूर्ण करूनही त्यांना बिलं मिळाली नाहीत, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आव्हाड यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी हजारो कोटींची तरतूद केली असली, तरी कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे.

“मी मागेच म्हणालो होतो, काही महिने जाऊ द्या… कंत्राटदार आत्महत्या करतील, आणि दुर्दैवाने ती सुरुवात झाली आहे,” असे आव्हाड यांनी नमूद केले.

Watch Ad

या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सरकारने तातडीने या गंभीर विषयात लक्ष घालून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!