अकोला न्यूज नेटवर्क
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पांडवादेवी येथे एक अनोखा आणि प्रेरणादायी विवाह सोहळा पार पडला. मुलनिवासी आदिवासी कातकरी समाज विकास सेवा संस्थेच्या पुढाकाराने तब्बल 1 हजार आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम केवळ विवाहापुरता मर्यादित न राहता आदिवासी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी टाकलेलं महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
या भव्य उपक्रमाला आदिम उन्नत सेवा संघ आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे सक्रिय सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, हरिद्वार येथील महामंडलेश्वर डॉ. भगवती नंदा अखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहून त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सामूहिक विवाह सोहळे केवळ खर्च वाचवतात असं नाही, तर सामाजिक समरसतेचाही आदर्श निर्माण करतात.
या सोहळ्याचे आयोजन केवळ काही दिवसांत नव्हे, तर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांतून शक्य झाले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष ईश्वर नाईक यांनी दिली. रायगड जिल्ह्यातून ही हजार जोडपी निवडून आणणे, त्यांचं समन्वय साधणे आणि अखेर या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे ही एक मोठी जबाबदारी होती. संस्था कार्यकर्त्यांनी या कामासाठी अपार मेहनत घेतली.
या उपक्रमातून विवाहात होणारा अनावश्यक खर्च वाचवून तो समाजोपयोगी मार्गाने कसा वापरता येतो, याचा आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवला आहे. आदिवासी विकास विभागाने अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. या सोहळ्यात सहभागी झालेल्या नवविवाहित जोडप्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठीही पुढाकार घेण्यात आला.

हा विवाह सोहळा केवळ एक सामाजिक उपक्रम नव्हता, तर आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल होते.