WhatsApp

गटारीचा जोरदार जल्लोष! पुण्यात ७०० टन चिकन, हजारो किलो मटण-मासळीवर खवय्यांनी केला ताव

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे ‘गटारी’ निमित्त बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खवय्यांनी सामिष पदार्थांवर अक्षरशः ताव मारला. सुमारे ६०० ते ७०० टन चिकन विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर हजारो किलो मटण आणि मासळीचीही जोरदार उलाढाल झाली.



श्रावण महिन्यात व्रतस्थ राहण्यासाठी अनेक घरांमध्ये मासाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे गटारी अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी सामिष खाण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. त्यामुळे सकाळपासूनच पुणेकरांनी मटण, मासळी, चिकनच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती.

गणेश पेठ, कसबा पेठ, विश्रांतवाडी, लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट यांसह विविध बाजारपेठांत खवय्यांची झुंबड उडाली. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळीची २० ते २५ टन, नदीतील मासळी २ टनांपर्यंत आणि आंध्र प्रदेशातून आलेली रहू, कतला, सीलन मासळीची २५ टन आवक झाली होती. पापलेट, सुरमई, कोळंबी यांना सर्वाधिक मागणी होती, अशी माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मटणाच्या बाजारातही उसळलेली गर्दी दिसून आली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे अडीच ते तीन हजार शेळ्या-मेंढ्यांची खरेदी-विक्री झाली. यासाठी पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतून मटण विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली, अशी माहिती हिंदू खाटीक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली.

Watch Ad

बॉयलर चिकनची विक्री ६०० ते ७०० टनांवर गेल्याचे पुणे बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी सांगितले. याचबरोबर अंड्याच्या दरात शेकड्याला ३० रुपयांची घट झाली. चिकनचे दर मात्र २०० रुपये किलोपर्यंत स्थिर राहिले.

किलो दरवाढीची स्थिती:
मटण – ७८० रुपये,
चिकन – २०० रुपये,
पापलेट – १२०० ते १८०० रुपये,
सुरमई – १००० ते १४०० रुपये,
वाम – १००० रुपये,
रावस – १००० रुपये,
कोळंबी – ४०० ते ७०० रुपये

Leave a Comment

error: Content is protected !!