अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक | विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ आणि शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता मंत्रिपद जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडील कृषी खाते मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. तर मकरंद पाटील यांच्याकडील खाते कोकाटे यांच्याकडे दिले जाणार असल्याचीही शक्यता आहे.
विधिमंडळात कामकाज सुरू असताना रमी खेळताना दिसलेल्या कोकाटे यांच्या कृतीवर विरोधकांनी आणि महायुतीतील काही नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट शब्दांत अप्रसन्नता दर्शवली होती. त्याचबरोबर कोकाटे यांनी शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणत केलेल्या विधानावरही संताप व्यक्त करण्यात आला. त्यावर स्पष्टीकरण देताना ‘शेतकरी नाही, शासन भिकारी’ असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले, मात्र त्याने अधिक वाद वाढवला.
या सर्व पार्श्वभूमीवर कोकाटेंच्या मंत्रिपदावर गंडांतर असल्याच्या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी महायुतीतील काही नेत्यांकडूनही होऊ लागली आहे. पक्षपातळीवरही नाराजी असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, कोकाटे यांच्या मंत्रिपदावर किंवा खातेबदलावर पक्षात अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले.
बुधवारी कोकाटे दिवसभर आपल्या नाशिकमधील निवासस्थानीच होते. त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले असून, माध्यमांशी संवाद टाळला. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोकाटे यांनी कोणालाही न भेटण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत या घडामोडींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.