अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कांदिवली येथील ‘सावली बार’ला प्रत्यक्ष भेट देत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बुधवार २३ जुलै रोजी झालेल्या या दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला आहे.
माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र असलेले योगेश कदम सध्या राज्याचे गृहराज्यमंत्री असून, त्यांच्या आईच्या नावावर ‘सावली बार’चा परवाना आहे. याच बारमध्ये वारंवार पोलिस कारवाया झाल्याचे आरोप विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. मंगळवारी उद्धव सेनेचे नेते आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या बारविषयी माहिती देत चौकशीची मागणी केली होती.
यानंतर बुधवारी अंजली दमानिया यांनी कांदिवलीच्या या बारला प्रत्यक्ष भेट देत तेथील परिसराची पाहणी केली. बारलगतच्या दुकानदारांकडून त्यांनी चौकशीही केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “जे गृहखाते महिलांच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे, त्याच खात्याचा मंत्री बार चालवतो हे लज्जास्पद आहे. अशा व्यक्तीचा मंत्रिमंडळात थांगपत्ता असू नये,” असे दमानिया म्हणाल्या.
दमानिया यांनी पुढे समता नगर पोलिस ठाण्याला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मागणी केली की, बारची चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून व्हावी आणि योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी.
या प्रकरणावर खुद्द योगेश कदम यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, विरोधकांनी हे प्रकरण गाजवण्याचे संकेत दिले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या या मुद्द्यावर आगामी अधिवेशनात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.