अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत २९ ऑगस्ट २०२५ रोजी संपत असल्याने काँग्रेसने या पदावर दावा सांगितला आहे. औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या दानवे यांच्या निवृत्तीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होणार आहे. याचा फायदा घेत काँग्रेसने आपल्या संख्याबळाच्या जोरावर विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी हालचाली तीव्र केल्या आहेत.
सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ, तर उद्धवसेनेचे सात सदस्य आहेत. दानवे यांच्या निवृत्तीनंतर शिवसेनेचे संख्याबळ सहावर येईल. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. या आधारे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सतेज पाटील सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते असून, त्यांच्या नावाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही मान्यता मिळाल्याचे समजते.
दरम्यान, उद्धवसेनेने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. या नावाला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठीही उद्धवसेनेचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास काँग्रेसला आहे. मात्र, विरोधी पक्षाच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के जागा कोणत्याही एका पक्षाकडे नसल्याने नार्वेकर यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. यामुळे विधान परिषदेतील निर्णयावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये या पदांबाबत एकवाक्यता होणे आवश्यक आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विधान परिषदेत आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसांत या पदाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.