अकोला न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एका विवाहितेने सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरोधात बंदुकीच्या धाकाने अत्याचार केल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे. रविंद्र लिंबाजी शिंदे असे संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तो सध्या धाराशिव जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पिडीता आणि आरोपी यांची ओळख ही जुनी असून, त्यांच्या घरांची जवळीक यामागे कारणीभूत ठरली. पिडीतेच्या फिर्यादीनुसार, २०१३ मध्ये रात्रीच्या सुमारास शिंदे याने तिच्या घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला. त्यानंतर पिडीतेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढले. हे उघड केल्यास पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली गेली.
याच अत्याचारांची मालिका पुढील काही वर्षे सुरू राहिली. पिडीता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिच्यावर बळजबरीने गर्भपातही करवून घेतल्याचे तिने सांगितले. नुकतेच १ जून रोजी आरोपी पुन्हा तिच्या घरात घुसला व पुन्हा बळजबरी केली. त्यानंतर १ जुलै रोजी संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या गंभीर आरोपांनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार रवींद्र शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून असे वर्तन झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.