अकोला न्यूज नेटवर्क
राजस्थानमधील उदयपूर येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रविवारी सकाळी घडलेली घटना थरारक ठरली. सेवाश्रम परिसरातील या हॉटेलच्या गार्डनमधील अडगळीतील जागा स्वच्छ करताना एक मोठा कोब्रा आणि त्याच्या तब्बल १८ पिल्लांचे अस्तित्व उघडकीस आले. अचानक एवढ्या सापांचा एकत्रित वावर पाहून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसह ग्राहकांचाही थरकाप उडाला.
गार्डनमध्ये दीर्घकाळ साचलेल्या अडगळीत कोब्रा मादीने अंडी घातली होती आणि त्यातून पिल्ले नुकतीच बाहेर आली होती. हॉटेलच्या स्टाफने हे दृश्य पाहताच तातडीने सर्पमित्र आणि वनविभागाच्या पथकाला पाचारण केलं. त्यांनी सगळ्या सापांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करून जंगलात सोडून दिलं.
या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झाली नाही हे नशीबच म्हणावं लागेल. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पिल्ले अंड्यातून अलीकडेच बाहेर आली होती आणि मोठा कोब्रा त्यांच्याबरोबर शांतपणे अडगळीच्या जागी होता.
या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर अनेकांनी सवाल उपस्थित केले आहेत. अनेक महिने जुनी अडगळ न हटवल्यामुळे सर्पांनी तेथे निवास केला होता. याप्रकरणी स्थानिक वनविभागाने तपास सुरू केला आहे.
या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोब्रा फॅमिलीचा अचानक समोर आलेला हा थरार नागरिकांमध्ये दहशत पसरवणारा ठरला आहे.