अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | राज्यात गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोपांचा भडिमार केला आहे. “या रॅकेटमध्ये किमान ५० मंत्री व वरिष्ठ अधिकारी अडकले असून, आरोपी प्रफुल्ल लोढाने ब्लॅकमेलिंग करत सुमारे २०० कोटी रुपये वसूल केले आहेत,” असा गंभीर दावा त्यांनी केला.
या हनीट्रॅप रॅकेटच्या माध्यमातून काही मंत्री, माजी मंत्री आणि प्रशासनातील उच्चपदस्थ व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. लोढा याने अनेकांकडे व्हिडीओ दाखवून पैशांची उधळपट्टी केली असून, तो कुणाचा कार्यकर्ता आहे हे उघड न करता त्यांनी लवकरच सर्व मुखवटे उघड होणार असल्याचे सूतोवाच केले.
मागील आठवड्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राईव्ह सादर करत मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सभागृहाने सरकारकडे निवेदनाची मागणी केली होती. मात्र सरकारकडून कुठलेही स्पष्ट उत्तर न आल्याने या प्रकरणावर आणखी साशंकता वाढली आहे.
दरम्यान, वडेट्टीवार यांनी सूरज चव्हाण प्रकरणावरही टीका करत, “त्याने एका कार्यकर्त्यावर हात उगारला असून, तरीही त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही,” असा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी या कृत्याला पाठिशी का घातली, याचे उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली.