अकोला न्यूज नेटवर्क
यवतमाळ | शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नवोदय विद्यालय समितीने प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख १३ डिसेंबर २०२५ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी १८ जानेवारी २०२५ रोजीच २०२४-२५ साठी परीक्षा पार पडली होती. त्यामुळे एका कॅलेंडर वर्षात दोनदा नवोदय पूर्व परीक्षा घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. परिणामी येत्या वर्षी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील संघटनांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
या बदलामुळे दुर्गम, आदिवासी व मागास भागांतील विद्यार्थ्यांना परीक्षेची योग्य तयारी करणे कठीण होईल, अशी चिंता व्यक्त होत आहे. वाड्या, वस्त्या, पोड आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये नवोदयसारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी कशी होणार, हा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषतः अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आणि मार्गदर्शनाची मर्यादा लक्षात घेता हा बदल विद्यार्थ्यांच्या संधींवर गदा आणणारा ठरू शकतो.
दिग्रस येथील शिक्षक नितीन डहाके म्हणाले, “पूर्वी परीक्षा मार्च महिन्यात घेतली जायची, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करून सरावाची संधी मिळत असे. आता डिसेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येणार.”
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेतल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेने यावर्षी १०० टक्के विद्यार्थी परीक्षा द्यावेत असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांनी संयुक्तपणे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. लवकरात लवकर योग्य निर्णय न झाल्यास, या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक क्षमतेवर होऊ शकतो.