अकोला न्यूज नेटवर्क
मँचेस्टर | भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने मँचेस्टर कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इंग्लंडच्या भूमीवर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करत एक ऐतिहासिक पराक्रम केला आहे. अँडरसन-तेंडुलकर चषक 2025 अंतर्गत सुरू असलेल्या या कसोटीत पहिल्या डावात 11 धावा करताच राहुलने हा टप्पा पार केला.
राहुल इंग्लंडमध्ये कसोटीत 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याच्याआधी सचिन तेंडुलकर (1575), राहुल द्रविड (1376), सुनील गावस्कर आणि विराट कोहली (1096) यांचा समावेश आहे. ही कामगिरी करताना राहुलने एक सातत्यपूर्ण फलंदाज म्हणून आपली छाप पुन्हा एकदा उमटवली आहे.
राहुलने इंग्लंडव्यतिरिक्त केवळ भारतातच 1000 पेक्षा जास्त कसोटी धावा केल्या आहेत. भारतात त्याने 32 डावांमध्ये 39.62 च्या सरासरीने 1,149 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक व 10 अर्धशतकांचा समावेश आहे.
विदेशी भूमीवर त्याची कामगिरी मिश्र राहिली आहे –
ऑस्ट्रेलियात त्याने 25.72 च्या सरासरीने 463 धावा, दक्षिण आफ्रिकेत 28.38 च्या सरासरीने 369 धावा, तर वेस्ट इंडिजमध्ये 48.14 च्या सरासरीने 336 धावा केल्या आहेत.
राहुलची ही कामगिरी भारताच्या आगामी विदेशी दौऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा प्रकारच्या योगदानामुळे त्याची कसोटी संघातली भूमिका अधिक भक्कम होत चालली आहे.