WhatsApp

कृषीमंत्र्यांचा ‘रमी’चा खेळ उफाळला; राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात अनोखे आंदोलन

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे |
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतील ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून बुधवारी पुण्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘कृषीमंत्र्यांचा रंगला जुगार, राज्यातील शेतकरी बेजार’, अशा घोषणा देत पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सोरट, मटका आणि नकली नोटांचे साहित्य मांडून निषेध व्यक्त केला.



पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, बाळासाहेब जाधव, आसिफ शेख, दीपक कामठे, पूजा काटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आंदोलनकर्त्यांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. जगताप यांनी स्पष्टपणे म्हटले की, “राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचे कर्ज असताना आणि रोज सरासरी ९ शेतकरी आत्महत्या करत असताना, कृषिमंत्री विधानसभेत रमी खेळत असल्याचा प्रकार लाजिरवाणा आहे. हे सरकार कोकाटेंच्या चुकीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करत आहे.”

कार्यकर्त्यांनी रमी खेळाच्या प्रतिकात्मक साहित्याचा वापर करून प्रशासनाला सरकारच्या दुटप्पी धोरणावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “राज्याच्या शेतकऱ्यांना हमीभाव नाही, कर्जमाफी नाही, पण कृषीमंत्री मात्र जुगार खेळत बसलेत,” अशी टिका आंदोलकांनी केली.

‘कोकाटे यांचा राजीनामा द्या, अन्यथा त्यांनाच मुख्यमंत्री करा; कर्ज फेडण्यासाठी ते रमी खेळतील’ अशा उपरोधिक घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी सरकार काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!